✍🏼अविनाश घोलपसंपादक, झेप

अवघाची राम…!
राम…आज अवघे जग राममय झालंय,१४वर्षांचा वनवास भोगल्यावर जेव्हा प्रभुराम अयोध्येत आले होते, तेव्हा जशी अवध नगरी उत्साहित झाली होती तोच उत्साह …कदाचित। त्याहीपेक्षा जास्त उत्साह आज राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचा आहे. तब्बल ५०० वर्षांनंतर भगवान राम गर्भगृहात स्थानापन्न होत आहेत.
पण मग या ५०० वर्षांच्या कालावधीत राम होते कुठे? वनवासात…? विजनवासात…? की अज्ञातवासात…??? भक्तहो, खरंतर प्रभुरामचंद्र होते तुमच्या आमच्या अंर्तमानात…तुमच्या आमच्या अंतःकरणात…एवढंच काय तर ते होते या सृष्टीच्या चराचरात आणि या पुढेही हजारो वर्षे असेच राहतील प्रकृतीच्या कणाकणात.
राम होते म्हणून तर आजही आपल्या जगण्यात राम आहे. जीवनातल्या प्रत्येक प्रारब्धाला राम भरोसे ठेऊन आपण जगतोय.कोणाला दिसताक्षणी राम राम केला, तर कोणी या इहलोकीची यात्रा संपविली म्हणून त्याला राम नाम सत्य है म्हणत अखेरचा निरोप दिला.
कुणासाठी तो सखा बनून सखाराम झाला, कुणासाठी तो राजाराम झाला. दुष्टांचा नाश करण्यासाठी हातात शस्त्र घेऊन तो परशुराम बनला,तर आपल्या अवती भवती घडणाऱ्या अनेक घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या मनाला शांत करण्यासाठी तो शांताराम झाला, तर काही वेळेस आत्मिक अनुभूती देण्यासाठी तो साक्षात आत्माराम देखील झाला.
उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला नवी ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी तो कधी प्रभुराम होता, तर कधी रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल दाखविणारा तो रामचंद्र देखील होता.
मातृत्वाच्या निरागस नात्यासाठी तो जसा रामल्लला होता…अगदी तसाच पतिपत्नीच्या नात्यातील ओलावा जोपासण्यासाठी तो रामजी देखील होता. कधी दोन भावंडांच्या अल्लड नात्यातील तो रामानुज होता…तर बहीण भावाच्या नात्यातील तो रामानंद होता.
ज्याच्या मनातील लंकापती रावण निघून गेला त्याच्या मनात साक्षात रघुपती बनून येणाराही तोच होता,मनामनात दास्यभक्ती रुजविणारा रामदास ही तोच होता, आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात कैवल्याचं चांदणं पेरणारा राघव सुद्धा तोच होता.
प्रभातकाली प्रत्येकाच्या मनी चिंतनारा चिंताराम तोच होता,अन पुढे वैखरीतून वदविणार रघुवीर ही तोच होता.
राम कशात नव्हता… तो आपल्या भजनात होता,तो आपल्या कीर्तनात होता,माऊलींच्या ज्ञानेश्वरीत होता,अन तुकोबांच्या गाथेतही होता,महाराणा प्रतापांच्या चेतक घोड्यातही होता,अन छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीतही होता. तो सावरकरांच्या त्यागातही होता आणि लोकमान्यांच्या देशभक्तीत ही होता,तो कुसुमाग्रजांच्या कवितेत होता आणि अत्रेंच्या लेखणीत ही होता.बाबासाहेब पुरंदरेंच्या वाणीतही होता,अन मराठी मनाला चेतविणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या ठाकरी बाण्यातही होता…एवढंच काय तर अगदी आत्ता हिंदुत्वाचा अंगार फुलविणाऱ्या मोदी आणि योगींच्या शिष्टाचारातही तोच आणि फक्त तोच आहे..!!
तो कुठेच गेला नाही आणि जाणार ही नाही, जोपर्यंत शबरीची श्रद्धा आणि भरताचा बंधुभाव आहे, लक्ष्मणाची मर्यादा, हनुमानाची भक्ती अन सीतेचं पावित्र्य आहे तोपर्यंत तो अखंड राहील…युगानुयुगे आपल्या सर्वांच्या तनामनात, अंतरीच्या अंतरात,प्रत्येक घराघरात आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनामनात….!!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्रीराम

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started