या वर्षीचा पावसाळा हा प्रत्येक माणसाच्या कायम लक्षात राहील,कारण पावसानं उशिरा केलेली सुरुवात,मध्ये केलेली जोरदार बॅटींग,कोल्हापूर, पुणे इथला महापूर,आणि अगदी दसऱ्यापर्यंत ठोकलेला मुक्काम या साऱ्याच बाबी लक्षात राहण्यासारख्या आहेत
” निसर्गाचं गणित बिघडलय” अशी ओरड प्रत्येकानेच केली ….. पण निसर्ग असा अचानक का बिघडला ? तो बिघडला, की त्याला बिघडायला भाग पाडले? आणि जर त्याला बिघडायला भाग पाडले असेल तर ते कोणी भाग पाडले हा खरा प्रश्न आहे….आणि या प्रश्नाचे उत्तर हे मानवानेच शोधावे लागेल.
पक्षांना कधी “सेकंड होम” ची गरज पडली का ? प्राण्यांना कधी “मिनरल प्लांट” उभारावा लागला का? या पशु पक्ष्यांना कधी अँड्रॉइड फोन किंबहुना मोबाईल ची गरज भासली का? मग माणसालाच का या सगळ्याची गरज भासली….त्याचं एकमेव कारण म्हणजे माणसाला असलेली भौतिक सुखाची हाव.भौतिक सुखाच्या नादात माणसाने स्वतःच्याच मृत्यूचा सापळा रचून ठेवलाय हे त्याला कळलेच नाही
पर्यावरण संवर्धन हा शब्द आता परवलीचा झाला आहे. वाढती कारखानदारी,रासायनिक खतांचा अति प्रमाणात वापर, वाहनांची वाढती संख्या, आणि या साऱ्यातून होणारे जल प्रदूषण,वायूप्रदूषण हे सारे चिंतेचे विषय होऊन बसले आहेत.
संवेदनशील माणसाच्या मनाला या साऱ्या गोष्टी खटकत आहेत,अस्वस्थ करीत आहेत त्या अस्वस्थतेतूच पर्यावरण संरक्षण ही संकल्पना पुढे आली आणि काही जागरूक मंडळी यावर काम करायला सिद्ध देखील झाली….!
जलप्रदूषण सारखा विषय घेऊन त्यावर काम करणारे,आणि खऱ्या अर्थाने जलक्राती घडवण्यासाठी स्वतःला झोकून देणारे हिरवळ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष, जलनायक किशोर धारिया…! विकास तर व्हायलाच हवा, रोजगार निर्मिती देखील हवी,आणि प्रदूषण नियंत्रण पण हवे यासाठी एम एम ए च्या सहयोगाने सी ई टी पी च्या माध्यमातून प्रदूषण रोखण्यासाठी काम करणारे संभाजी पाठारे……!जंगलात लागणाऱ्या (कि लावल्या जाणाऱ्या) वनव्या सारखा धगधगता विषय घेऊन तो विझविण्यासाठी हातात त्याच जंगलातील झाडाच्या झावळ्या घेऊन त्या वनव्यातच उडी घेणारा किशोर पवार…..!
एकीकडे विकासाच्या नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल होत असताना,दुसरीकडे स्वतःच्या 100 एकर जागेत भारतीय वंशाची झाडे लावून जंगल उभं करणारे नंदू तांबे…!
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहून आयुर्वेदिक महत्व लक्षात घेऊन तीच उपचार पद्धती स्वीकारणारे व त्यातून निसर्ग संवर्धन करणारे डॉ राजीव तलवार… कधीकाळी श्रीमंती चे प्रतीक असलेली आणि गो माय वसते लक्ष्मी हे ब्रीद मिरवणारी भारतीय गाय निसर्ग संवर्धनासाठी किती महत्वाची आहे हे पटवून देणारे व शेकडो शेतकऱ्यांना गो दान करून गायीचे संवर्धन करणारे पंचगव्य सिद्ध मिलींद धारप….. धीरज वाटेकर, प्रणव क्षिरसागर, डॉ सृजन धारप,रूपा दवणे ह.भ.प. मोहिरे महाराज ही आणि यांच्या सारखी अनेक मंडळी आज या परिवर्तनाच्या वाटेवरचे प्रवासी होऊन आपापल्यापरीने पर्यावरण संरक्षण करण्यासाठी काम करीत आहेत,यांचे हे काम आज नक्कीच आशादायक आणि प्रेरणादायी आहे
या वर्षीचा झेप अंक हीच प्रेरणा आणि हाच आशावाद आपल्यासमोर घेऊन येत आहे
आज प्रत्येकाला सुख हवंय,प्रत्येकाला चांगले पर्यावरण हवे,पण स्वतः मध्ये बदल करून नाही तर हे सारे आपोआपच व्हायला हवे आणि ते कधीच शक्य नाही.खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण बदलायला हव्यात जसे की बाजारात जाताना कापडी पिशवी घेऊन जाण्याची सवय आपण स्वतःला लावून घेण्याची गरज आहे, प्रवासात घरची पाण्याची बाटली सोबत घ्यायला हवी,शून्य कचऱ्यासारखी संकल्पना राबवायला हवी….असं खूप काही करता येऊ शकते
आणि या साऱ्या सकारात्मक गोष्टींची सुरुवात आपल्या स्वतःकडून व्हायला हवी तरच परिवर्तन घडेल…..नाही तर निसर्ग कठोर झाल्याशिवाय राहणार नाही….!
चला तर मग या परिवर्तनाच्या वाटेवरचे आपण ही सहप्रवासी होऊया…!
झेप च्या १५ वर्षांच्या वाटचालीत अनमोल साथ देणाऱ्या व पाठीवर कौतुकासह विश्वासाची थाप देणाऱ्या सर्व वाचक,जाहिरातदार,हितचिंतक यांना दिवाळीच्या पर्यावरण पूरक शुभेच्छा