अलाैकीक साैंदर्यानं नटलेलं कुडपण
सकाळचे आठ वाजले हाेते ,सिस्केप चा बीजाेत्सव रद् झाला हाेता, बाहेर धाे-धाे पाऊस पडत हाेता त्यातच शनिवार असल्यामुळे सुट्टी हाेती, इतकं सारं जुळून आलं असताना हा याेग मला वाया घालवायचा नव्हता.
मिलिंदजीं ना फाेन केला, म्हटलं काय करायचं…..मिलिंदजीं नी दुस-या सेकंदाला सांगितलं कुडपण ला जायचं…….बस्स बाईक घेतली अन् निघालाे….
पाेलादपूर पासून महाबळेश्वर च्या दिशेला जाताना लेप्रसी हॉस्पीटल च्या पुढे उजव्या बाजूला गेलाे की ताे रस्ता कुडपण ला जाताे.
मुळात पाेलादपूर हा तालूका तसा डाेंगर द-यात वसलेला, एकीकडे ढवळ्यातून मनाला भूरळ घालणारा चंदनगड आपल्याला दिसताे, तर दुस-या बाजूला शिवरायांच्या प्रतापाची साक्ष देणारा प्रतापगड, एका भल्यामाेठ्या डाेंगरावर काेणीतरी छाेटा डाेंगर ऊचलून ठेवल्याचा भास करून देणारा आेंबळीचा “मीठाचा खडा” असाे अथवा एका माेठ्या दगडाला एका निष्णात कारागिरानं तासून तिक्ष्ण टाेक बनवावी असा टाेकदार दिसणारा कांगाेरी असाे, रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्याचं रणशिंग जिथे फुंकले त्या ” राय-याच्या मु-या” चे कामथ्याच्या कुशीतून हाेणारे दर्शन असेल, किंवा नरवीर तानाजी मालूस-यांच्या समाधीला नतमस्तक हाेवून पुढे साक्षात त्या समाधीला अभिषेक घातल्याचा भास करून देणारा “माेरझाेत” चा धबधबा असेल….या सा-या गाेष्टी पाेलादपूरचं वैभव आहेतच परंतू या नैसर्गिक अविष्कारातलं माेरपिस म्हणजे शेलार मामांचं कुडपण……!
पाेलादपूर पासून जेमतेम २७ ते २८ किमी हा प्रवास परंतू बाईक वरून फिरताना किमान दाेन ते अडिच तास लागतात. एकतर पुर्ण चढाई,त्यातच डाेंगर तासून तयार केलेला नागमाेडी रस्ता,आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हांला जागाेजागी थांबायला भाग पाडणारं नैसर्गिक साैंदर्य..….!
माेरगीरी,खडपी,गांजवणे,देवपूर अशी गावे पार केल़्यावर आपण एका फाट्यावर येताे,जिथून पुढे सरळ एक रस्ता काेतवाल ला जाताे व डाव्या बाजूचा रस्ता कुडपण ला जाताे. पुढे गाेळेगणी पास केल़्यावर क्षेत्रपाळ पासून उजव्या बाजूला वळलाे की कुडपण चा घाट सुरू हाेताे.
क्षेत्रपाळ गावातून जर हा रस्ता पाहिला की या रस्ताची खरी गंमत कळते, आपल्या छबीन्यातले आकाश पाळणे खालून पाहणा-या ची जशी अवस्था असते काहीशी तशी अवस्था हाेते,एका बाजूला कापलेला उंच डाेंगर, दुस-या बाजूला खाेल दरी,आणि डाेंगराच्या त्या धारेतून जाणारी एस टी ची गाडी ! हे चित्र फार मनमाेहक आहे ( हा रस्ता हिमाचल च्या कांगडा व्हॉली आठवण करून देताे)हा सारा प्रवास आपण जीव मुठीत घेवून करत असताे, त्या भेदरलेल्या वातावरणात असतानाच आपण खिंड पार करताे आणि झपकण आपल्या डाेळ्यावर अंधार येताे, काही दिसेनासं हाेतं, आपण भांबावलेल्या नजरेनं आ वासून पहात असताे…… तेवढ्यात समाेरच्या दरीतून धूक्याचा लाेट उठताे…. सारं वातावरण व्यापून टाकताे ….. त्या सा-या परिस्थितीचा आपण अंदाज घेत असतानाच त्या काळ्याकुट्ट वातावरणात एक पांढरीशुभ्र रेघ त्या गिरिशिखरांवर उमटलेली दिसते….. थाेडं सावध हाेवून अंदाज घेत असता आपल्या लक्षात येतं की ती पांढरी रेघ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या महाकाय गिरिशिखरांवरून काेसळणारा प्रचंड माेठा प्रपात आहे……!
हळूहळू धूक्याची ती चादर नाहीसी हाेते… आभाळ स्वच्छ हाेतं… हिरवेगार वनश्रीने नटलेले ते डाेंगर नजरेस पडतात …… आणि मघाशी त्या गिरिशिखरांवर उमटलेल्या रेघेचं प्रतीबिंब आपल्या चेह-यावर उमटतं, आणि या नैसर्गिक अविष्कारात आपण हरवून जाताे………!
अलाैकीक साैंदर्यानं नटलेलं कुडपण (उत्तरार्ध)
आपण जेव्हा एखादा धबधबा पाहताे तेव्हा बहुतांशी असं हाेतं की, आपण त्या धबधब्याच्या तळाशी असताे,मात्र कुडपण चा हा धबधबा याला अपवाद आहे. हा धबधबा आपण त्याच्या उगमस्थाना पासून पहात असताे. थाेडक्यात आपण याचा माथा पाहू शकताे मात्र तळ पाहू शकत नाही.
खेड, चिपळूण मध्ये वाहणा-या जगबूडी नदीचे उगमस्थान म्हणजे हा कुडपण चा धबधबा…..!
एकतर महाबळेश्वर मध्ये तांडव नृत्य करून दमलेला पाऊस शांत व्हायला पाेलादपूर मध्ये येताे, शिवाय सह्याद्रीच्या डाेंगररांगामुळे धूक्याची देखील एक मस्त दुलई पसरलेली असते….त्यावेळी ख-या अर्थानं आपण ढगात गेल्याचा अनुभव घेत असताे.
हा संपूर्ण परिसर फिरताना आपल्या लक्षात येते की निसर्गाने इथे मुक्तहस्ते उधळण केली आहे. अनेक प्रकारचे वृक्ष, पक्षी, प्राणी यासारख्या जैवविविधतेनं नटलेला हा प्रदेश आहे.
महसूली रचनेनुसार कुडपण चे दाेन भाग पडतात. कुडपण खुर्द व कुडपण बुद्रूक. परंतू लाेकांनी त्यांच्या साेयी नुसार याचे कुडपण १, कुडपण २, व कुडपण ३ असे भाग केलेत. अनेक छाेटे छाेटे साकव व नागमाेडी रस्त्याने एकमेकांना जाेडलेले हे भूभाग, डाेंगराच्या एकाच धारेत वसलेले आपल्याला पहायला मिळतात.
रायगड जिल्ह्य़ातलं शेवटचं गाव म्हणजे कुडपण परंतू याच साेबत रत्नागिरी व सातारा या दाेन्ही जिल्ह्य़ांच्या सिमा या गावाला स्पर्श करतात.
इथल्या निसर्गा प्रमाणेच इथली जगरहाटी. ईथल्या लाेकांनी त्यांचं जगणं फार साेप करून घेतल्याचं आपल्याला दिसतं. एकीकडे माेबाईला रेंज नसली तरी अस्वस्थ हाेणारे आपण, आणि दुसरी कडे निसर्गाने जे आयुष्य वाट्याला दिलयं त्यात समाधानानं जगणारी सही इथली माणसं……!
पाेटाची खळगी भरण्यासाठी भिवाच्या काठीवरून पायपीट करून,प्रतापगडाचा डाेंगर पाऊण तासात पार करणारी महिला पाहीली अन् थक्क झालाे. घरातलं अठराविश्व दारीद्र्य असून देखील “मला पाच मुलं आहेत” असं काैतुकानं सांगणा-या त्या महिलेला जेव्हा भेटलाे तेव्हा घरातली कर्मकहानी न सांगता ती महीला “सर जेवून जा ” असं म्हणते तेव्हा आपल्याच खुजेपणाची कीव येते…….!
महाराष्ट्र शासनानं कुडपण ला पर्यटन स्थळाचा दर्जा दिलाय. शासन पातळीवर विकासात्मक प्रयत्न सुरू आहेत. ते सारं हाेईल तेव्हा हाेईल.
परंतू ईथल्या मातीनचं यांना साेशिक बनवलयं, या सह्याद्रीच्या रांगांनी बळ दिलयं, इथलं माेकळं आभाळचं यांना आपुलकीचा पाठ देतं,अन् इथला निसर्गचं यांना जगण्याची उमेद देताे……!
—- अविनाश घाेलप